हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला आहे. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात ईडीने तपास बंद करण्यासंदर्भातील अहवाल विशेष पीएमएलए न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मूळ गुन्हाच बंद झाल्याने आता मनी लाँड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे कारण नसल्याचे ईडीने आपल्या अहवालामध्ये म्हटले होते. त्यानंतर आता विशेष पीएमएलए न्यायालयाने देखील हा अहवाल स्वीकारला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने ईडीने ऑगस्टमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत दाखल प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. २०२३ मध्ये शेतकऱ्यांना साखर कारखान्यात भागधारक करण्याचे आश्वासन देऊन निधी गोळा केल्याचा मुश्रीफ कुटुंबावर आरोप झाला होता. सुमारे ४० हजार शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता. यामाध्यमातून जमा झालेले सर्व पैसे मुश्रीफ यांच्या कंपन्यांकडे वळवल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला होता.
या प्रकरणात ईडीने तीन वेळा छापे टाकून २.१५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि रोख रक्कम जप्त केली होती. या सर्व प्रकरणामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान या प्रकरणात आता न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply