प्राचीन भारतातील महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कूटनीतीतज्ज्ञ म्हणून आर्य चाणक्य यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या ग्रंथात माणसाने आयुष्य कसे जगावे याचे सार मांडले आहे. या ग्रंथातील अनेक विचार आजच्या काळातही लोकांना मार्गदर्शक ठरतात.
चाणक्य यांच्या मते माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, ज्या कधीही विसरता कामा नयेत. या गोष्टी माणसाला त्याच्या कर्तव्याची सतत जाणीव करून देतात आणि त्यातच त्याचे हित सामावलेले असते. मात्र या गोष्टींचा विसर पडला तर माणूस दिशाहीन होतो आणि हळूहळू त्याच्या हातातील सर्व गोष्टी निसटून जातात, असे चाणक्य यांनी म्हटले आहे.
कर्ज आणि अपमान कधीही विसरू नका
कर्जाबाबत चाणक्य यांचा सल्ला स्पष्ट आहे. माणसाने आयुष्यात कधीच कर्ज घेऊ नये; अगदी खूपच गरज असेल तरच कर्ज घ्यावे. मात्र एकदा कर्ज घेतले की त्याचा विसर पडू देऊ नये. डोक्यावर असलेल्या कर्जाचा विसर पडला तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे.
अपमानाबाबतही चाणक्य यांचे मत वेगळे आहे. एखाद्या व्यक्तीकडून आपला अपमान झाला असेल तर तो कधीही विसरू नये, कारण काही अपमान असे असतात जे माणसाला सुधारण्याची संधी देतात. त्यामुळे झालेला अपमान लक्षात ठेवावा, असे चाणक्य म्हणतात.
उपकार आणि मैत्री आयुष्यभर जपा
एखाद्या व्यक्तीने संकटाच्या काळात आपली मदत केली असेल, आपल्याला अडचणीतून बाहेर काढले असेल, तर त्या व्यक्तीचे उपकार आयुष्यभर विसरू नयेत. उलट त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा तिच्या मदतीला धावून जावे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
मैत्रीबाबत चाणक्य म्हणतात की मैत्री नेहमी काळजीपूर्वक करावी. परंतु एकदा कोणाशी मैत्री झाली की त्या मैत्रीला आयुष्यभर कधीही अंतर देऊ नये. या चार गोष्टी लक्षात ठेवल्यास आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने होते, हाच चाणक्य नीतीचा सार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply