बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. रणजीत दत्तात्रय शितोळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. वॉर्डमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार रणजीत शितोळे हे मद्याच्या दीर्घकालीन व्यसनाने त्रस्त होते. त्यांना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दाखल होताना त्यांना रक्ताच्या उलट्या आणि फिट्स आल्याची माहिती नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली होती.
त्यानुसार रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. मेंदूचा सीटी स्कॅन करण्यात आला, तसेच मानसोपचारतज्ज्ञ आणि कान-नाक-घसा तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता. दरम्यान रुग्णाची प्रकृती आणि वर्तणूक अस्वस्थ असल्याने नातेवाईकांना वारंवार माहिती देण्यात आली होती. रुग्णाजवळ नातेवाईकांनी थांबण्याची सूचनाही देण्यात आली होती. मात्र नातेवाईक रुग्णालयातून निघून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तोल जाऊन खाली पडले
आज, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास रुग्णाने वॉर्डमधील पॅसेजच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्यावरील छतावर पडला. घटनेची माहिती मिळताच रुग्णाचा शोध घेण्यात आला. तो गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर तातडीने अपघात विभागात हलवण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय-कायदेशीर नोंद करण्यात आली असून पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply