दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर संस्कारांचा मेळ आहे. आज हा सण केवळ भारतात नव्हे, तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा होतो. दिवाळीतील प्रत्येक दिवसामागे एक कथा, एक संस्कार आणि आरोग्याचा संदेश दडलेला आहे. बलिप्रतिपदा आणि भाऊबीज ही त्याचीच दोन सुंदर उदाहरणे आहेत.
बलिप्रतिपदा: बळीला दिलेला सन्मान
कार्तिक महिन्याचा पहिला दिवस म्हणजे पाडवा. या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीला ओवाळते. हा संस्कार आशीर्वादासाठी आणि उज्ज्वल संसारासाठी केला जातो. याच दिवसाला बलिप्रतिपदेचे वेगळे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतारात बळीला पाताळात ढकलले. मात्र बळीच्या आजोबांच्या इच्छेनुसार विष्णूंनी त्याला वरदान दिले की, बळी पाताळाचा राजा राहील आणि लोक त्याची पूजा करतील. म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात.
पाडव्याच्या या संस्कारातून एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि सुविचार यांचा मेळ साधला जातो. भेटवस्तू देऊन नाती दृढ करण्याची परंपरा याच दिवसाशी जोडलेली आहे. गोड पदार्थ खाऊ घालून आरोग्य स्थापनेचा संदेशही यात दडला आहे. दिवाळी केवळ शरीराचेच नव्हे, तर मनाचे आरोग्य टिकवणारा सण आहे, हेच यातून दिसून येते.
भाऊबीज: भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण
दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होतो आणि या दिवसाला यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाची कथा या सणामागे आहे. यमाच्या निधनानंतर यमीचे दुःख थांबत नव्हते, तेव्हा दिवस संपल्याचे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली, अशी कथा सांगितली जाते. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली, असे मानले जाते.
या दिवशी बहीण आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून यमराजाची पूजा आणि प्रार्थना करते. भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करतो. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस आणि मग भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात भेट देऊन बहिणीचा सत्कार करतो. या सणात चंद्रप्रकाशाचे आरोग्यदृष्ट्या महत्त्वही सांगितले आहे. कोजागरीला चंद्रासमोर दूध ठेवून नंतर ते सेवन करण्याची परंपराही याच विचाराशी जोडलेली आहे. यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे आणि अलंकार देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवशी बहीण भावाची पूजा करते आणि प्रेमाचा टिळा लावते. हा टिळा बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमभावनेचे प्रतीक मानला जातो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply