दिवाळी जवळ येत असताना मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घरांची सजावट आणि रोषणाईची तयारी जोरात सुरू झाली आहे. यंदा सजावट केवळ घरांपुरती मर्यादित न राहता गृहनिर्माण सोसायट्या आणि राजकीय पक्षही सामूहिक सजावटीकडे वळले आहेत. एकाच संकल्पनेवर आधारित, पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे आणि मोठ्या आकाराचे कंदील लावून परिसर उजळवण्याचा नवा कल दिसून येत आहे.
एकाच डिझाइनचे कंदील
दिवाळीनिमित्त अनेक राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयांसह मतदारसंघातील परिसर सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंदिलांची मागणी नोंदवली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनीही इमारतींमध्ये मोठे कंदील लावण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आकार आणि डिझाइनचे कंदील घेण्याऐवजी एकाच डिझाइनचे आणि मोठ्या आकाराचे कंदील खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
पर्यावरणपूरक साहित्याची पसंती
यंदा प्लॅस्टिकऐवजी कागद, बांबू आणि रंगीत कापड यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या कंदिलांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. पारंपरिक कलाकुसरीला आधुनिक रचनेची जोड देत एलईडी दिव्यांनी सजवलेले कंदीलही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आकर्षक सजावटीसोबतच पर्यावरणाची काळजीही घेतली जात आहे.
यंदा विविध राजकीय पक्षांकडून १०० हून अधिक, तर सुमारे २५ गृहनिर्माण सोसायट्यांकडून कंदिलांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. सोसायट्यांमध्ये एकाच प्रकारचे कंदील लावण्यावर भर असल्याने एकाच डिझाइनचे कंदील मोठ्या संख्येने तयार करावे लागत आहेत, अशी माहिती कंदील विक्रेते रवी बेतबंसी यांनी दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply