नाशिक जिल्ह्यातील ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरमहा किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी आणि त्यावर महागाई भत्ता लागू करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
प्रलंबित मागण्यांसाठी काळी दिवाळी आंदोलन
नाशिक जिल्हा ईपीएफ ९५ पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आयुष्यभर विविध उद्योग आणि संस्थांमध्ये काम करून देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावणाऱ्या कामगारांना सेवानिवृत्तीनंतर अत्यंत कमी पेन्शनवर गुजराण करावी लागते. अनेक पेन्शनधारकांना महिन्याला केवळ एक ते दोन हजार रुपये मिळतात. वाढती महागाई, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च पाहता या रकमेत सन्मानाने जीवन जगणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०१४ मधील ई-६०९ ठरावाद्वारे झालेले अन्यायकारक बदल रद्द करावेत, अधिक पेन्शनसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लाभ द्यावेत आणि पेन्शनची फेरगणना करून थकबाकी अदा करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नही ऐरणीवर
एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन अर्ज पीएफ कार्यालयाकडून स्वीकारले जात नसल्याने संबंधित कर्मचारी दीड वर्षांपासून अडचणीत आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निदर्शनानंतर जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात राजू देसले, शिवाजी ढोबळे, नामदेवराव बोराडे, उत्तमराव आढाव, डी. बी. जोशी, रमेश खापरे, सुभाष शेळके, भाऊसाहेब शिंदे, साहेबराव शिवले, शिवराम रसाळ यांच्यासह पेन्शनधारक सहभागी झाले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply