धुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत डेंगी, मोकाट श्वान आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मोकाट श्वान आणि डेंगीच्या प्रश्नावर धुळेकर नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सभेत करण्यात आला.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी, पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. सभापती लताबाई पोतदार, उपायुक्त हेमंत निकम, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
जलशुद्धीकरणासाठी लागणाऱ्या तुरटी आणि ब्लिचिंग पावडर या रसायनांचा पुरवठा करण्याच्या सन २०२६-२७ आणि २०२७-२८ या वर्षांसाठीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय सभेपुढे होता. तो चर्चेअंती मंजूर करण्यात आला. तसेच मानधनावरील कनिष्ठ अभियंते, संगणक लिपिक आणि वर्ग-चार कर्मचारी अशा एकूण नऊ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने फेरनियुक्ती देण्याचा विषयही मंजूर झाला.
महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी नाही?
सत्ताधारी भाजपचे सदस्य अमोल मासुळे यांनी डेंगी आणि मलेरियाच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणी व धुरळणीसाठीच्या वाहनांवर कर्मचारी लावण्याचा आदेश महापौर मायादेवी परदेशी यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत संबंधित विभागाला दिला होता, असे सांगितले. मात्र त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महापौरांच्या आदेशालाच यंत्रणा जुमानत नसेल तर इतरांचे काय, असा सवालही त्यांनी केला.
मोकाट श्वानांच्या प्रश्नावरही त्यांनी संताप व्यक्त केला. प्रशासनातर्फे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ठेकेदाराचे बिल प्रलंबित असणे आणि दोन ठेकेदारांमधील भांडण अशा कारणांमुळे श्वान निर्बीजीकरणाचे काम थांबल्याचे सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता
सत्ताधारी सदस्य कृपेश नांद्रे यांनी प्रभागात गटार स्वच्छतेसाठी फक्त चारच कर्मचारी असल्याचे सांगितले. स्वच्छता करताना पाच-पाच कर्मचारी एकाच ठिकाणी काम करतात, त्यामुळे संपूर्ण स्वच्छता होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. विरोधी एमआयएमचे सदस्य आमीर पठाण यांनी कागदावर तीस तर प्रत्यक्ष कामाला दहाच सफाई कर्मचारी असतात, असे सांगत आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. सदस्या वंदना भामरे आणि योगिता कुटे यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या तक्रारी केल्या.
आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त हेमंत निकम यांनी सदस्यांच्या संतप्त प्रश्नांवर उत्तर देताना स्वच्छता निरीक्षकांनी नियोजनपूर्ण काम करायला हवे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी आरोग्य विभागाला दिला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply