नाशिकमध्ये सणासुदीच्या काळात सायबर भामट्यांनी दोघांना जाळ्यात ओढून तब्बल साडेबारा लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. यातील एकाचा मोबाईल हॅक करून बँक खात्यातील साडेआठ लाख रुपये वर्ग करून घेण्यात आले, तर दुसऱ्याच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून सुमारे चार लाख रुपये लांबवण्यात आले. दोन्ही प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
मोबाईल हॅक करून साडेआठ लाख लंपास
६१ वर्षीय व्यावसायिक समशेरसिंग राऊतसिंग चौधरी यांचा मोबाईल २६ ऑक्टोबरला दुपारी संशयिताने हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ८ लाख ५४ हजार ३३२ रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक करण्यात आली. चौधरी हे हरीओम लँडमार्क, पाथर्डी फाटा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.
एपीके फाईलद्वारे खात्यातील रक्कम गायब
दुसऱ्या घटनेत निवृत्त कर्मचारी श्रीकांत शंकर जोशी यांच्या खात्यातून ३ लाख ८७ हजार रुपये लांबवण्यात आले. ६७ वर्षीय जोशी हे ग्रीन बिल्डिंग, टाकळी रोड येथील रहिवासी असून २७ ऑक्टोबरला सकाळी घरात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने एपीके फाईल पाठवली. जोशी यांनी ती फाईल उघडताच भामट्याने त्यांच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १७ हजार आणि ३ लाख ७० हजार रुपये असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून निरीक्षक सुनील बडे तपास करत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply