नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कुंभमेळ्याच्या कामांवर थेट प्रश्न उपस्थित केले. मेळ्याच्या नावावर ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात जमिनीवर तेवढी कामे कुठेच दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला.
चांगले रस्ते उकरून ठेवल्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पडून १५ ते १६ नाशिककरांना जीव गमवावा लागल्याचेही पवार यांनी म्हटले. काम व्हावे, हीच आपली भूमिका असल्याचे सांगत धर्माच्या नावावर भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
प्रयागराजशी तुलना आणि १० दिवसांची मुदत
प्रयागराज कुंभमेळ्यात एका दिवसात १६ कोटी भाविक आले असतानाही तेथील खर्च सात हजार कोटी रुपये झाला होता, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. मग नाशिकमध्ये ३५ हजार कोटींची कामे नेमकी कुठे सुरू आहेत, याचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभ आयुक्तांना पत्र दिले असून माहिती देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळच्या लोकांचा सात ते आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा दावाही पवार यांनी केला. तसेच सीएसआरची झाडे तोडून हॉटेल बांधणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
गोदावरी प्रदूषणावर २० दिवसांचा अल्टिमेटम
गोदावरीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी एमआयडीसी आणि प्रदूषण मंडळाला २० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. रसायनयुक्त पाणी नदीत मिसळत असून त्यावर काम न केल्यास महागात पडेल, असा इशारा पवार यांनी दिला. रिंगरोडला परवानगी नसल्याचे आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले. संतांच्या नावाने राजकारण केले जाते, पण त्यांच्यावर एक रुपयाही खर्च होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
पार्थ-जय यांच्यात वितुष्टाचा प्रयत्न असल्याचा आरोप
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पटत नसल्याने भाजपला राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे, असा आरोपही पवार यांनी केला. त्यासाठी भाजप चाणक्य नीती वापरून पार्थ पवार आणि जय पवार या दोघा भावांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून पार्थ आणि सुनेत्रा पवार यांना एकटे पाडत असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षातील काही अतृप्त आत्मे यासाठी वापरले जात असल्याचेही ते म्हणाले. जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली, तरी गोड शब्द ऐकून भुलू नका आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने सावध पावले उचला, असा सल्ला पवार यांनी दोघांना दिला. भुजबळ आणि मुश्रीफच पार्थ-काकींच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेपूर्वी पवार यांनी रामकुंड परिसरातील कामांची पाहणी केली आणि त्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply