महाराष्ट्रात काही ठिकाणी सहकारी बँकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून सहकार कायद्यात बदल करण्याचीही मागणी केली आहे.
उपसमितीच्या उत्तरांवर नाराजी
हाके यांनी सांगितले की, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठका घेतल्या असल्या तरी त्यानंतरच्या घडामोडींवर ते समाधानी नाहीत. नोकरीतील प्रतिनिधित्व, आरक्षणाबाबतची उत्तरे आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात उपसमितीशी चर्चा झाली असून आता हा मुद्दा उपसमिती सचिवांकडे गेल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हानिहाय आकडेवारी आणि कायद्यात बदलाची मागणी
सांगलीतील २१ जागांपैकी अनुसूचित जमाती, ओबीसी आणि व्हीजेएनटी यांना प्रत्येकी एक अशा केवळ तीन जागा मिळाल्याचे हाके यांनी सांगितले. साताऱ्यात व्हीजेएनटी, ओबीसी आणि अनुसूचित जाती यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली, तर सोलापुरात ओबीसीसाठी एकच जागा होती. त्या जागेसाठी राजन पाटील यांच्या पुत्राने आणि संजय शिंदे यांच्या पुतण्याने अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. आमदार-खासदारांच्या मुलांसाठी या निवडणुका असल्याचा आरोप करत सातारा, सोलापूर आणि सांगली येथे एकाच जातीला ९०-९० टक्के जागा असल्याचा दावा त्यांनी केला. सहकार कायदा बदलून त्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण लागू झाले पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी याचे निवेदन दिल्याची माहिती दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply