नंदुरबार जिल्ह्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटू लागले आहेत. महायुतीतील घटक पक्षांचे नेते स्वबळावर लढण्याची भाषा करू लागल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. राज्यात सत्तेवर एकत्र आणि जिल्ह्यात निवडणुका स्वतंत्र, हा फार्म्युला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राबवला जाण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच पेटले आहे.
भाजपतर्फे माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून गावपातळीवर दौरे आणि मेळावे सुरू केले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची जनजाती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने त्यांना बळ दिले आहे. माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गावित भगिनींनी ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत.
दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले त्यांचे सुपूत्र ॲड. राम रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता पुन्हा उपाध्यक्षपदाची सूत्रे आपल्याकडे असावीत यासाठी रघुवंशींनी कंबर कसली आहे. महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही पक्षाने आदेश दिल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवू, अशी घोषणा केली आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांची भूमिका पाहता हे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
मित्रपक्षांमध्येच शाब्दिक चकमक
जिल्ह्यात भाजपची मस्ती अद्याप जिरलेली नाही, असे सांगून आमदार रघुवंशींनी मित्रपक्षाला डिवचले आहे. तर जगातील सर्वात मोठ्या पक्षावर बोलताना आमदार रघुवंशी यांनी भान राखावे, अशा शब्दांत माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे दोन, शिवसेना पक्षाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही, मात्र हसन मुश्रीफ यांच्या रूपाने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. काही दिवसांपूर्वी निधीच्या कारणातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबारला झालेल्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना रडू कोसळले होते. विकासकामांना निधी मिळत नसल्याचा आरोप करून रघुवंशींनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
शहादा पालिकेकडेही लक्ष
तीच परिस्थिती शहादा पालिकेच्या बाबतीतही दिसली होती. पालिकेला निधी दिला जात नसल्याचा आरोप करीत अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. येणाऱ्या निवडणुकीत महायुती एकमेकांसमोर लढणार की वरिष्ठांच्या आदेशानंतर स्वबळाची तलवार म्यान करणार, हे लवकरच कळेल. मात्र ऐन दिवाळीत महायुतीने स्वबळाचे फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply