दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दादर बाजारपेठेत सणाच्या खरेदीची लगबग वाढली आहे. दिवाळीच्या सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे आकर्षक दिवे, तोरणे, फुलांच्या माळा आणि रांगोळीचे साचे यांनी बाजारपेठ सजली आहे. घराचे दरवाजे आणि परिसर सजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगीबेरंगी स्टिकर्सकडेही ग्राहकांचे लक्ष वेधले जात असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
यंदा पारंपरिक पणत्यांसोबतच विविध रंग, आकार आणि नक्षीकाम असलेल्या सजावटीच्या पणत्यांचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात रांगोळी काढण्यासाठी नव्या डिझाइनमधील सजावटीच्या रांगोळ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. कमी वेळेत आकर्षक रांगोळी साकारता यावी, यासाठी तयार डिझाइनच्या रांगोळ्यांनाही विशेष मागणी आहे.
पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचा मिलाफ
दिवाळीच्या सजावटीत फुलांचे महत्त्व लक्षात घेता कृत्रिम तसेच रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक माळा, तोरणे आणि विविध सजावटीचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहे. घराचे मुख्य प्रवेशद्वार, भिंती आणि परिसर सजविण्यासाठी आकर्षक स्टिकर्सचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक डिझाइनचा मिलाफ साधणाऱ्या या वस्तू ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत.
घरात आणि घराबाहेर लावण्यात येणारे सुंदर दिवे, सुगंध देणाऱ्या डिझाइन केलेल्या डबीतील दिवे आणि सेलवर चालणारे दिवे ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. दरवाजाला लावण्यात येणाऱ्या अगदी खऱ्या फुलांसारख्या वाटणाऱ्या फुलांच्या माळा आणि तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. एकंदरीत, दिवाळीनिमित्त दादर बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत असून, घराघरांत दिवाळीचा आनंद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी ग्राहकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे.
सजावटीच्या वस्तूंचे दर काय?
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पणत्यांची किंमत २० रुपयांपासून १०० आणि २०० रुपयांपर्यंत आहे. डेकोरेटिव्ह दिवे ४०० ते ७०० रुपयांना, डेकोरेटिव्ह रांगोळीचा साचा १०० ते ५०० रुपयांना, तर फुलांच्या माळा आणि तोरणे १०० ते ४०० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply