शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडकसबे गावात शिरपूर पॅटर्न अंतर्गत नव्या बंधाऱ्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ झाला, तर माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या बंधाऱ्यासाठी निधी माजी खासदार कै. मुकेशभाई पटेल यांची कन्या मेहा पटेल यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टमार्फत दिला आहे. मेहा पटेल यांच्याकडून तालुक्यातील जलसंधारण कामांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये दिले जातात. गेल्या वर्षी या निधीतून १४ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून, आताचा बंधारा त्या निधीतून उभारला जाणारा २७ वा बंधारा आहे. शिरपूर पॅटर्न मालिकेतील हा ४८० वा बंधारा ठरणार आहे. आमदार अमरीशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून ही बंधाऱ्यांची मालिका साकारली जात आहे.
बंधाऱ्याची वैशिष्ट्ये आणि पाणीसाठा
तऱ्हाडकसबे येथील बंधाऱ्यासाठी सुमारे ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बंधाऱ्याची लांबी ४० मीटर असून, १५ ते २० फूट खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सुमारे दोन कोटी ६५ लाख लिटर पाणीसाठा तयार होईल, तर सुमारे साडेपाच कोटी लिटर पाणी जमिनीत मुरून त्याचे पुनर्भरण होईल.
रस्ते विकासालाही हातभार
शिरपूर पॅटर्नचे मुख्य तत्त्व म्हणजे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते शेतीसाठी आणि भूजल पुनर्भरणासाठी वापरायचे. आतापर्यंत या मालिकेतील ४७५ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून, त्यांच्यामधून सुमारे दोन हजार कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होण्याची व्यवस्था आहे. बंधाऱ्यांच्या कामाबरोबरच ग्रामीण भागात रस्तेही तयार होत आहेत. आतापर्यंत सुमारे १९० किलोमीटर नाला खोलीकरण झाले असून, बाहेर काढलेल्या मातीतून सुमारे १६० किलोमीटर लांबीचे रस्ते बनवण्यात आले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply