सन २०२६ च्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आगाऊ मदत व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये. तसेच शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करू नयेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना दिले आहेत.
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळग्रस्त १३ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये आगाऊ मदत जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने शासनाकडून प्राप्त होणारी मदत शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा होणारा मदतीचा निधी इतर कर्ज खात्यांमध्ये वळता केला जात असल्याचे किंवा शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित बँकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कोणत्याही परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती अथवा वर्गवारी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून वेळोवेळी जमा होणारे अनुदान किंवा मदतीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या खात्यावर कोणत्याही परिस्थितीत होल्ड लावू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदींनुसार संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच सर्व तहसीलदारांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (टंचाई शाखा) यांचा हा आदेश क्र. कक्ष-१३/नै.आ/४४१/२०२६, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजीचा आहे.
Leave a Reply