नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जीवनशाळांमधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित मणिबेली आणि डनेल येथील जीवनशाळांमध्ये हे शिबीर घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दुर्गम भागातील लोकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा मिळावी, हा या शिबिरामागील उद्देश होता.
पुणे येथील मायमर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकाने हे शिबीर घेतले. डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. मिलिंद कांजाळकर, डॉ. अभिमन्यू, डॉ. प्रिया करमानी, डॉ. रुपाली महेशगौरी, डॉ. गायत्री, डॉ. राहुल काशीदे, धनश्री देसाई, डॉ. गौरी भोये, डॉ. ओम थोरात, डॉ. श्रुती पाटील आणि डॉ. प्रतीक रसाळ यांचा या पथकात समावेश होता. धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष परमार तसेच करुणानिधी संस्थेचे नितीन सावंत, दशरथ शिंदे आणि सचिन चिखले यांनीही या कामात सहभाग घेतला.
खडतर प्रवास करून डॉक्टर पोहोचले
डॉक्टरांचे पथक पिंपळखुटा ते जांगठी या खडतर रस्त्यावरून प्रवास करीत मणिबेली शाळेत पोहोचले. तेथून बोटीने आणि बोट ॲम्ब्युलन्सने डनेल येथे पोहोचण्यात आले. तेथे आरोग्य तपासणी करून गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले. रात्री जीवनशाळेतच मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी बोटीने मणिबेली येथे पोहोचून विद्यार्थी आणि गावकऱ्यांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
डोळे तपासणी, चष्मे वाटप आणि औषधोपचार
या शिबिरात डोळ्यांची तपासणी करून गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले. एक्स-रे तपासणी तसेच दमा रुग्णांची पीएफटी तपासणीही करण्यात आली. डनेल, मुखडी, बामणी, चिमलखेडी, धनखेडी, जांगठी आणि मणिबेली या गावांतील रुग्णांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी नर्मदा नवनिर्माण अभियानाचे लतिका राजपूत, चेतन साळवे, सियाराम पाडवी आणि विरसिंग पावरा यांनी पुढाकार घेतला. जीवनशाळेचे शिक्षक राजेश वसावे, रिमा पाडवी, रवी पाडवी, शिरीष कुमार पाडवी, प्रेमसिंग वसावे आणि विरसिंग पावरा तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply