लहान मुले खेळण्यांशी खेळत असताना त्यांच्यावर किती बारीक लक्ष ठेवावे लागते, याची प्रचिती एका घटनेतून आली आहे. एका 16 वर्षांच्या मुलाला सतत डोके दुखू लागल्याने त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तपासणीनंतर त्याच्या कानात चुंबक असल्याचे आढळून आले. त्याच्या आईने सांगितले की, लहानपणी तो चेसच्या लोहचुंबकाशी खेळत असे आणि त्यावेळी त्याने कानात हे चुंबक टाकले असावे. चार वर्षांचा असताना कानात गेलेले हे चुंबक तब्बल 12 वर्षे कानातच राहिले.
कानाचा पडदा सुरक्षित, त्यामुळे धोका टळला
मुलगा 16 वर्षांचा झाल्यानंतर कानात राहिलेल्या चुंबकामुळे त्याला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी कानाची तपासणी केली असता त्यात गोल चुंबक दिसले. या चुंबकामुळे कानाच्या आतील त्वचा पूर्णपणे सडून गेली होती. सुदैवाने कानाचा पडदा सुरक्षित असल्याने मोठा धोका टळला. मीरा रोड येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतीही इजा न करता हे चुंबक यशस्वीरित्या बाहेर काढले.
लहान मुलांना छोट्या वस्तू देऊ नका
या घटनेनंतर डॉक्टरांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. लहान मुले खेळत असताना त्यांना कोणतीही छोटी वस्तू देऊ नये. अशी वस्तू कानात किंवा घशात अडकली आणि श्वास नलिकेत गेली, तर मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालकांनी खेळताना मुलांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply