येवला तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असताना सोमवारी संध्याकाळी शेवगे परिसरात एक थरारक घटना घडली. कांदा चाळीत काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. निफाड तालुक्याच्या शिवारालगत सत्यगाव आणि मुखेड परिसरात दिसणारे बिबटे आता तालुक्याच्या चारही भागांत शिरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आधीच दहशत पसरली आहे. यापूर्वी वनविभागाने वेळोवेळी पिंजरे लावून बिबटे पकडलेही आहेत. शेवगे परिसरातील गट क्रमांक ४१ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर सातत्याने सुरू असल्याचे सांगितले जाते.
कांदा चाळीत काम करताना झडप
सोमवारी सायंकाळी पाच वाजता शेतकरी रोहित रतन झांबरे (वय २६) आपल्या शेतातील कांदा चाळीत नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रोहित यांनी जोरदार आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आले, त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. विशेष म्हणजे हा बिबट्या शेतकऱ्यांच्या दिशेनेही धावत सुटला होता, मात्र प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांनी जोरदार आरडाओरडा केल्याने बिबट्या झुडपांच्या दिशेने पळून गेला. या हल्ल्यात रोहित यांच्या पायाला आणि हाताला जखम झाली आहे. कामात व्यस्त असताना अचानक बिबट्याने हल्ला केला, मात्र वेळीच स्वतःला सावरत बाजूला पळत आरडाओरडा केल्याने पुढील अनर्थ टळला, असे त्यांनी सांगितले. या अचानक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
या भागात बिबट्याला पकडण्यासाठी यापूर्वी वनविभागातर्फे पिंजरे लावण्यात आले होते, मात्र अनेकदा बिबट्या या पिंजऱ्यांमध्ये जेरबंद झालेला नाही. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जीविताची मोठी हानी टळण्यासाठी वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply