पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळील सेवा रस्त्याच्या नियोजित पुलाखालून वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी उंची मिळत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिका, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली. या वेळी पुलाच्या खांबांची उंची साडेचार मीटर ठेवण्याबाबत चर्चा होऊन सहमती झाली. सर्व विभागांनी मिळून सुधारित आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
३.३ मीटर उंचीमुळे वाहनांना अडथळ्याची भीती
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल ते वारजे दरम्यान सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. वडगाव पुलाजवळ ओढ्यालगतचा रस्ता प्रयेजा सिटी आणि सनसिटी परिसरातील सोसायट्यांना जोडतो. या रस्त्यावरून जाणाऱ्या पुलाची नियोजित उंची ३.३ मीटर असल्याने स्कूल बस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. या विषयाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून कौन्सिल हॉलमध्ये संबंधित विभागांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली.
१५ दिवसांत अंतिम निर्णय; समन्वयावर भर
परिसरातील १२ मीटर रुंदीच्या रस्त्याजवळ मेट्रोचा खांबही प्रस्तावित आहे. त्यामुळे महामार्ग आणि मेट्रोच्या कामांमध्ये समन्वय ठेवून स्थानिक रस्त्यांची जोडणी कायम राखण्यावर पाहणीदरम्यान भर देण्यात आला. महापालिकेचा पथ व प्रकल्प विभाग, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्रित आराखडा तयार करावा, असे ठरले. येत्या १५ दिवसांत संबंधित अधिकारी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. यापूर्वी १५ ऑक्टोबरला आमदार भीमराव तापकीर यांनीही पाहणी करून काम थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. संयुक्त पाहणीवेळी नगरसेवक काका चव्हाण, संदीप रायकर, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे दिनकर गोजारे, पथ विभागाचे उपअभियंता विजय दाभाडे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुभाष घंटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply