अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर केली. यावेळी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, बालरंगभूमी परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष महेश डोकफोडे, खजिनदार ईश्वर जगताप आणि सहकार्यवाह विजय शिंगणे उपस्थित होते. हे पुरस्कार सोहळ्याचे अकरावे वर्ष असून गुरुवारी महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अॅड. निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सोहळ्याच्या सुरुवातीला ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात प्रथम आलेल्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.
स्मृती पुरस्कारांचे मानकरी
दोन हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरूपाच्या स्मृती पुरस्कारांमध्ये अभिनय (पुरुष) विभागात एकनाथ सातपूरकर यांना दत्ता भट स्मृती पुरस्कार, अभिनय (स्त्री) विभागात वृषाली कुलकर्णी यांना शांता जोग स्मृती पुरस्कार, दिग्दर्शनासाठी राजेश जाधव यांना प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, लेखनासाठी देवेन कापडणीस यांना नेताजी भोईर स्मृती पुरस्कार, नेपथ्यासाठी राजेंद्र जाधव यांना रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार, संगीतासाठी अतुल गांगुर्डे यांना चारुदत्त दीक्षित स्मृती पुरस्कार, रंगभूषेसाठी ललित निकम यांना बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार, बालरंगभूमीसाठी पूनम पाटील यांना पुरोहित स्मृती पुरस्कार, सांस्कृतिक पत्रकारितेसाठी शैलेंद्र तनपुरे यांना जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार, लोककलावंत म्हणून राजेश शर्मा यांना रामदास बरकले स्मृती पुरस्कार, शाहीर पुरस्कार प्रा. प्रवीण जाधव यांना शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी बाळासाहेब शिंदे यांना वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
विशेष पुरस्कार आणि रंगसंघांचा गौरव
अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह स्वरूपाचा रंगतपस्या पुरस्कार अभिनेते अक्षय मुडावतकर यांना जाहीर झाला आहे. पंधरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असलेले रंगनायिका पुरस्कार मानसी मारू, रंगनायक पुरस्कार अमोल थोरात आणि रंग दिग्दर्शन पुरस्कार वरुण भोईर यांना मिळणार आहेत. सर्वोत्कृष्ट रंगसंघ पुरस्कारात प्रथम क्रमांक विजय नाट्य मंडळाला आणि द्वितीय क्रमांक परिवर्तन बहुद्देशीय संस्थेला जाहीर झाला असून या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे आहे. विशेष योगदान पुरस्कारांमध्ये सामाजिक क्षेत्रासाठी लक्ष्मण सावजी, शैक्षणिक क्षेत्रासाठी सचिन जोशी, सांस्कृतिक क्षेत्रासाठी पल्लवी कदम, दिव्यांग लोककलावंत म्हणून मनोहर नेटावणे आणि चित्रपट क्षेत्रासाठी श्रीया तोरणे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply