भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्या वतीने पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्या कार्यालयात, न्यू पनवेल, रायगड येथे होणार आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या अर्जाची त्रिप्रत (तीन प्रती) संबंधित लेखा अधिकारी किंवा पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्या कार्यालयाकडे ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवावी. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
निवृत्तीवेतनधारकांनी अर्जामध्ये निवृत्ती अथवा मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, निवृत्तीवेतनधारकाचे नाव, सेवेतून निवृत्त झालेल्या कार्यालयाचे नाव, निवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, पेन्शन मिळत असलेल्या पोस्ट ऑफिसचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशील तसेच स्वाक्षरी व दिनांक नमूद करावा.
पेन्शन अदालतीमध्ये कायदेशीर स्वरूपाचे वादग्रस्त प्रकरण, वारसा प्रमाणपत्र, काल्पनिक निवृत्तीवेतन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ, तसेच शिस्तभंगाच्या कारवाईशी संबंधित आरोपपत्र आणि विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply