पनवेल : नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पनवेल महापालिकेतर्फे सोमवारी मुख्यालयातील बैठक कक्षात लोकशाही दिन पार पडला. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विविध विभागांशी संबंधित तीन अर्ज दाखल झाले आणि संबंधित तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडवण्यात आल्या.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपक्रम
नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात आणि त्यांचे वेळेत निराकरण व्हावे, या उद्देशाने महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. दाखल झालेल्या तीन अर्जांवर संबंधित विभागांनी कार्यवाही करून तक्रारदारांना दिलासा दिला. या वेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त स्वरूप खारगे, शहर अभियंता राजेश कर्डिले, उपअभियंता विलास चव्हाण आणि सामान्य प्रशासन विभागप्रमुख कीर्ती महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही दिनासाठी अर्ज कसा करावा
महापालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी हा उपक्रम राबवला जातो. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारींचे अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे किमान १५ दिवस आधी सादर करावेत. तसेच अर्जदारांनी लोकशाही दिनाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply