भुसावळमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन झाले. या वेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डॉ. केतकी पाटील आणि रजनी सावकारे आदी उपस्थित होते. शहरासह ग्रामीण भागातील महिलांना या मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांची दिवाळी गोड होईल, असे मत सावकारे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
दोनशेहून अधिक महिलांचे स्टॉल
प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमाचे १४वे वर्ष होते. मेळाव्यासाठी ब्राह्मण संघाची जागा उपलब्ध करण्यात आली होती. या मेळाव्यामुळे स्थानिक वस्तूंना बाजारपेठ मिळते. शिवाय महिलांच्या हाताला या काळात कामही मिळते. विनामूल्य जागा उपलब्ध झाल्याने महिला उद्योजकांच्या दोन पैशांची बचत होते. शहरासह परिसरातील नागरिक मेळाव्याला भेट देत असल्याने स्थानिक वस्तूंचे चांगले मार्केटिंगही होते. या मेळाव्यात शहरासह तालुक्यातील दोनशेपेक्षा जास्त महिलांनी आपले स्टॉल लावले आहेत.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे देशातील चलन देशातच राहण्यास मदत होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून हा उद्देश साध्य होत असल्याचे सावकारे यांनी सांगितले. सेवाभावी वृत्तीने राबवला जाणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून त्यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांची दिवाळी गोड झाल्याचे ते म्हणाले.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावरच महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांसाठी विनामूल्य स्टॉल लावून देण्यात आल्याने त्यांच्या दोन पैशांची बचत झाली आहे. या माध्यमातून रोजगार मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक स्तरावरच खरेदी करावी आणि मेळाव्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply