लातूर येथील शिवाजीनगर भागातील कुरिअर सेवेच्या एका वाहनातून पार्सल खाली उतरवताना शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. विलासराव देशमुख मार्गावर उमाटे इंटरनॅशनल कुरिअर सेवा आहे. वेगवेगळ्या कुरिअरचे पार्सल या दुकानात येतात आणि येथून शहरात वितरित केले जातात. शनिवारी सकाळी या कुरिअर सेवेच्या वाहनातून पार्सल खाली काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, नागनाथ स्वामी (वय ५२) यांनी एक पार्सल बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे फेकले, तेव्हा त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात स्वामी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाहनाचे मोठे नुकसान
स्फोटानंतर वाहनाच्या टपाचा काही भाग उडाला. वाहनात मागच्या बाजूला खड्डा पडला आणि आतमधील सर्व पार्सलच्या चिंधड्या उडाल्या. इतकेच नव्हे, तर वाहनचालकाच्या समोरील मोठा काच तुटून बाहेर पडला. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय.एन., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्यासह सर्व पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.
एटीएस, बॉम्ब शोधक पथकाचा तपास
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेडचे एटीएसचे सहायक पोलिस निरीक्षक अवेज काझी, पोलिस संजय काळे आणि विष्णू पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यासोबतच बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकानेही येऊन घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब शोधक पथकाने वाहनातील सर्व संशयित साहित्य बाहेर काढले आणि फॉरेन्सिक पथकाने संशयित साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. चार ते पाच तास ही सर्व पथके घटनास्थळावर तपास करीत होती. एअर पिस्टलच्या साहित्याचा स्फोट झाल्याचा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे, तरी सर्वच बाजूने तपास करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात काही एअर पिस्टल आणि छर्रे सापडले आहेत. २९ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून एका बंदूक दुकानासाठी हे पार्सल आले होते. दोन दिवस ते उन्हात ठेवण्यात आले होते आणि आजही ते पार्सल बाहेर काढताना संबंधित व्यक्तीने ते फेकले. पार्सल उन्हात ठेवणे आणि घर्षण यामुळे या कारटेजचा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. या कारटेजमध्ये सीओटू गॅस असतो. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे, तर दुसरा किरकोळ जखमी आहे. हे पार्सल कोणी आणि कोणाला पाठवले, याचाही तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी संशयित साहित्याचे नमुने पाठवण्यात येणार आहेत. सह्याद्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हनुमंत किणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी नागनाथ स्वामी यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला मोठा मार लागला आहे आणि सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply