भोकर येथील भारतीय स्टेट बँकेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी, असे निर्देश दिले. गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सांगितले.
घटनास्थळाची पाहणी आणि धाडसी नागरिकांचे कौतुक
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्वतः भोकर येथील बँकेत जाऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. संशयितांना पकडण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या विदगाव, भोकर व डिकसाई येथील तरुण व ग्रामस्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच अल्पावधीतच परिसर पिंजून काढत संशयितांना पकडण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करणारे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचेही कौतुक करण्यात आले. बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धैर्याचे आणि दरोडेखोरांना केलेल्या प्रतिकाराचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक, बँक व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी आणि भोकर येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सतर्क राहण्याचे आवाहन
जिल्हा पोलिस अधीक्षक व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी परिसरात शोधमोहीम राबवत असताना पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तपासाचा आढावा घेतला. यापुढेही नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply