पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन गळतीमुळे गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या योजनेतून कासेगावसह परिसरातील १४ गावांना पाणी दिले जाते, त्यामुळे या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
भीमा नदी जवळ असूनही दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळी खालावली आहे. त्यात शासनाची पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या योजनेतून कासेगाव, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर, शिरगाव, रांजणी, मुंढेवाडी, कोंढारकी, ओझेवाडी, सिद्धेवाडी, आंबे, नेपतगाव, तावशी आणि लक्ष्मी टाकळी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा आणि तोपर्यंत टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
अधिकाऱ्यांवर टाळाटाळीचा आरोप
गेल्या २० दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करणे आणि पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक असताना संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप गोपाळपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन आसबे यांनी केला आहे.
जुनी पाइपलाइन आणि नवीन निधी
कासेगाव योजनेला इसबावी येथील भीमा नदीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाइपलाइन जुनी झाल्याने ठिकठिकाणी गळती होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात गळती होत असल्याने ते दुरुस्तीला विरोध करत आहेत आणि पाइपलाइन रस्त्याच्या कडेने न्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या विषयी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असून त्यांच्या सूचनेनुसार लवकरच गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नितीन करवते यांनी सांगितले.
कासेगाव योजनेची पाइपलाइन जुनी झाल्याने इसबावी परिसरात वारंवार गळती होत आहे. नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी निधी मंजूर झाला असून संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढून पाणीपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे गोपाळपूरचे माजी सरपंच विलास मस्के यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply