मुरमाड जमीन, पाण्याची कमतरता आणि शेतीतील अनिश्चितता या आव्हानांवर मात करत इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील बापूराव किसन दुधाळ यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे. १९९३ मध्ये दोन एकरांवर सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ५० एकरांपर्यंत पोहोचला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी परिसरातील २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना डाळिंब शेतीचे मार्गदर्शन करून प्रगतीची नवी वाट दाखवली आहे.
दोन एकरांपासून ५० एकरांपर्यंतचा प्रवास
शेळगाव आणि कडबनवाडी परिसर डाळिंब शेतीसाठी ओळखला जातो. कमी पाण्यात येणारे पीक, मुरमाड जमीन आणि कोरडे हवामान या भागातील डाळिंब शेतीला पोषक ठरते. या नैसर्गिक अनुकूलतेला शेतकऱ्यांच्या मेहनतीची जोड मिळाल्याने परिसरात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. आकर्षक रंग, उत्तम गुणवत्ता आणि चवीमुळे शेळगावच्या डाळिंबाने बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. दुधाळ यांनी १९९३ मध्ये दोन एकरांवर लागवड करून सुरुवात केली. पारंपरिक पिकांच्या तुलनेत डाळिंबातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी हळूहळू क्षेत्र वाढवले. आज बापूराव दुधाळ यांच्याकडे २५ एकर, तर त्यांचे बंधू ब्रह्मदेव दुधाळ यांच्याकडे २५ एकर असे एकूण ५० एकर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. त्यांच्या पत्नी वंदना आणि मुलगा अजिंक्य यांच्यासह कुटुंबातील सदस्य रात्रंदिवस शेतीत कष्ट करतात.
पाण्याचे नियोजन आणि बाजारपेठेतील यश
शेळगाव परिसरात पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. ही गरज ओळखून दुधाळ कुटुंबाने सुमारे दोन एकर क्षेत्रात दोन शेततळी तयार केली आहेत. पावसाळ्यातील पाणी आणि विहिरीचे पाणी शेततळ्यांमध्ये साठवून उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात बागेच्या सिंचनासाठी वापरले जाते. त्यांच्या बागेत १३ फूट बाय ६ फूट अंतरावर झाडांची लागवड असून एका एकरात साधारण ५६० झाडे आहेत. योग्य व्यवस्थापनामुळे त्यांच्या बागेत एकरी साधारण २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यांच्या बागेत भगवा जातीचे डाळिंब घेतले जाते. आकर्षक लालसर रंग, मऊ दाणे आणि रसाळ चव ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. ते जानेवारी ते मार्च या काळात बहार धरतात आणि साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान फळांची काढणी करतात. त्यांच्या डाळिंबाला युरोप, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांसह इतर देशांमध्ये निर्यात होते. त्यांना प्रतिकिलो १७५ रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला असून सरासरी विक्रीदर प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा अधिक राहिल्याचे सांगितले जाते. दोन्ही भावांनी एकसारखी घरे बांधली असून त्यांना कृषीधन असे नाव दिले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply