हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत असताना पशुधनाचे संगोपन कसे करायचे, हा पशुपालकांसमोरचा मोठा प्रश्न असतो. या अडचणीवर उपाय म्हणून धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील प्रयोगशील पशुपालक विनोद इंगळे यांनी उपलब्ध उसाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून त्यापासून मुरघास तयार करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. स्वतःच्या शेतातील उसापासून ते हा मुरघास तयार करत आहेत.
मुरघास कसा तयार केला जातो
तीन टन मुरघासासाठी अडीच टन उसाची कुट्टी केली जाते. त्यात कल्चर पावडरची चार पुडे मिसळली जातात आणि पोत्यामध्ये भरताना ठराविक थरावर मक्याचे अर्धा क्विंटल भरड टाकले जाते. उसामध्ये ओलावा अधिक असल्याने मक्याची भरड टाकल्यास ओलावा कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण पोत्यामध्ये ४५ दिवस हवाबंद पद्धतीने साठवले जाते. त्यानंतर तो चारा पशूंना आहार म्हणून दिला जातो.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी, मार्गदर्शनही
जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुपालकांना पर्यायी चारानिर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर कृषी व पशुसंवर्धन विभाग भर देत आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दीपक मुळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी इंगळे यांच्या शेताला भेट देऊन या प्रयोगाची पाहणी केली आणि पशुपालकांना मार्गदर्शन केले. शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला मुरघास जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याचा पर्याय ठरू शकतो, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. इंगळे यांच्याकडे ४० जनावरे असून, इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply