देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला उघड विरोध केला आहे, तर काही पक्षांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात सरकार हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.
हे विधेयक मंजूर झालं आणि पुनर्रचना लागू झाली, तर लोकसभा तसंच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या मतदारसंघांच्या सीमा बदलतील. एवढंच नाही, तर या जागांची संख्याही बदलणार आहे. सध्याच्या प्रस्तावांनुसार लोकसभेच्या जागा ५४३ वरून जास्तीत जास्त ८५० पर्यंत वाढू शकतात. खासदारांची संख्या वाढल्यावर सरकारी तिजोरीवरील खर्चाचा बोजा वाढेल, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे.
जागा किती वाढणार, खर्च किती?
भविष्यात खासदारांची संख्या वाढेल, हे गृहीत धरूनच नवं संसद भवन बांधण्यात आलं आहे. या भवनात लोकसभेचे ८८८ सदस्य बसू शकतील, तर राज्यसभेसाठी ३८४ सदस्यांची आसनक्षमता आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीवेळी एकाच वेळी १,२७२ सदस्य बसू शकतात. हे भवन उभारण्यासाठी ८६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या लोकसभेत ५४३, तर राज्यसभेत २४५ जागा आहेत.
राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका केली आहे. अमेरिकेत १९२९ नंतर लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, तरी तिथल्या खासदारांची संख्या वाढवली गेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. भारतात लोकसंख्या वाढली, पण सामान्य माणसासाठी डॉक्टर, शिक्षक, शाळा, रुग्णालयं आणि तरुणांसाठी रोजगार वाढवले जात नाहीत. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी खासदारांची संख्या वाढवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मंत्रिमंडळाच्या खर्चाचे आकडेही याच चर्चेत समोर आले आहेत. एका दाव्यानुसार सध्या ६८ मंत्री असलेल्या मंत्रिमंडळावर सरकार दरवर्षी करदात्यांचे ६२० कोटी रुपये खर्च करतं. म्हणजेच सरासरी प्रत्येक मंत्र्यावर दरवर्षी ९.१ कोटी रुपये खर्च होतात. डिलिमिटेशननंतर मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या ८१ वरून १२२ पर्यंत जाऊ शकते.
खासदार आणि आमदारांना काय मिळतं?
खासदारांना दरमहा १ लाख २४ हजार रुपये मूळ पगार, ८७ हजार रुपये मतदारसंघाचा भत्ता आणि ७५ हजार रुपये कार्यालयीन खर्चासाठी दिले जातात. अधिवेशनादरम्यान किंवा संसदीय समितीच्या बैठकांसाठी त्यांना इतरही अनेक सुविधा मिळतात. यामध्ये मोफत विमान प्रवास, मोफत रेल्वे प्रवास आणि रस्ते प्रवासाचा खर्च सरकारकडून दिला जातो. याशिवाय दरवर्षी १.५ लाख मोफत लोकल कॉल्स, गाडी खरेदीसाठी ४ लाख रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम, वर्षाला ४ हजार किलोलिटर मोफत पाणी आणि ५० हजार युनिट मोफत वीज अशा सुविधाही दिल्या जातात.
जर डिलिमिटेशननंतर लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत गेली, तर सरकारचा दरमहा होणारा खर्च १८६ कोटी रुपयांवरून थेट २९१ कोटी रुपयांवर जाईल. खासदार वाढले की त्यांच्या राहण्याची घरं, सुरक्षा आणि इतर सोयीसुविधांचीही व्यवस्था करावी लागेल. तसंच लोकसभा किंवा विधानसभांच्या जागा वाढल्यास त्याचा मोठा परिणाम निवडणुकीच्या खर्चावरही होऊ शकतो.
आमदारांच्या बाबतीत प्रत्येक राज्यानुसार त्यांचे पगार आणि भत्ते वेगवेगळे असतात. दिल्ली विधानसभेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार तिथल्या एका आमदाराला दरमहा ३० हजार रुपये पगार, मतदारसंघाच्या कामांसाठी २५ हजार रुपये भत्ता आणि कार्यालयासाठी १५ हजार रुपये दिले जातात. याशिवाय फोनसाठी १० हजार, प्रवासासाठी १० हजार आणि रोजचा दीड हजार रुपये भत्ताही मिळतो. लॅपटॉप, संगणक, प्रिंटर किंवा मोबाईल यांसारखी साधनं विकत घेण्यासाठी एकदाच १ लाख रुपये दिले जातात, तर स्वतःसाठी किंवा कुटुंबासोबत प्रवासासाठी दरवर्षी जास्तीत जास्त १ लाख रुपये दिले जातात. आमदारांना आरोग्य सुविधाही पुरवल्या जातात आणि महिन्याला ४ डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या पगारासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकारकडून परत मिळवता येतो.
३० नोव्हेंबरला, म्हणजेच सोमवारी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून त्यात हे डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विधेयकावरून संसदेत तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा