संसदेत सादर केल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने जात असल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पवारांवर घणाघाती टीका केली. या टीकेला भाजप नेते आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
वडेट्टीवार यांनी शरद पवारांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनी पद्धत असल्याची टीका केली होती. त्यावर विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांनी बोलताना भान ठेवावे, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, असे सुनावले आहे.
वडेट्टीवारांची टीका आणि विखे पाटलांचे प्रत्युत्तर
काँग्रेसने शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत एकत्र सत्तेत असताना काँग्रेसला शरद पवार चांगले वाटत होते. देशाचा विचार करताना मतदारसंघ पुनर्रचनेसारखे विधेयक आवश्यक आहे, असेही विखे पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे नेतेच राज्यभर फिरून एकमेकांवर टीका करत आहेत, त्यामुळे नेत्यांचेच भान सुटले आहे, अशी खोचक टिप्पणीही विखे पाटलांनी केली.
दरम्यान, भाजपमध्ये गेल्यापासून शरद पवारांवर वारंवार टीका करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज थेट पवार यांच्या बाजूने खिंड लढवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात बदलू पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बावनकुळेंचा काँग्रेस खासदारांबाबत दावा
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला काँग्रेसमधील अनेक खासदारांचा वैयक्तिक स्तरावर पाठिंबा आहे. मात्र पक्षाच्या दबावामुळे त्यांना मनाविरुद्ध विधेयकाच्या विरोधात मतदान करावे लागेल. काँग्रेसचे अनेक खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करतील, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर काँग्रेसमधील किती खासदारांनी विधेयकाला समर्थन दिले, हे स्पष्ट होईल, असे बावनकुळे म्हणाले.
मतदारसंघ पुनर्रचना हा केवळ पक्षीय राजकारणाचा विषय नसून विकसित भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे एका आमदाराला आपल्या संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना पुरेशा सुविधा आणि सेवा पुरविणे कठीण होत आहे. त्यामुळे मतदारसंघांचा आकार कमी होणे आणि लोकप्रतिनिधींची संख्या वाढणे आवश्यक आहे. याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत लोकप्रतिनिधींना पोहोचणे अधिक सुलभ होईल. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनाही या निर्णयाचे महत्त्व माहीत आहे, मात्र पक्षाच्या भूमिकेमुळे त्यांना आपली वैयक्तिक भूमिका मांडता येत नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा