शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकावर जोरदार टीका केली आहे. हे विधेयक महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनसाठी आणले जात असून, हा महाराष्ट्राशी आणि देशाशी प्रतारणा असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधेयकामागे डिलिमिटेशनचा डाव?
राऊत यांच्या मते, हे विधेयक कायमस्वरूपी सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने आणले आहे आणि यात देशहित किंवा लोकशाहीचा कोणताही विचार नाही. देशात लोकशाही टिकून राहिली पाहिजे आणि संसदेची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे निर्घृण कायदे संसदेत मंजूर होऊ नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
राहुल गांधींचे कौतुक, मोदी-शहांवर टीका
राहुल गांधींनी शरद पवारांना विधेयकाला समर्थन दिल्यानंतरही इंडिया आघाडीत स्थान अबाधित ठेवल्याबद्दल राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान या विचाराचे त्यांनी समर्थन केले, जिथे विरोधकांचाही सन्मान राखला जातो. मात्र, मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला त्यांनी खुनशी आणि सुडवृत्तीचे म्हटले. जर विधेयकाला पाठिंबा दिला नाही, तर खासदार फुटण्याची भीती सुप्रिया सुळे यांना वाटत असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा