महिला आरक्षण प्रत्यक्षात आणायचे असेल, तर संविधानात दुरुस्ती करून डिलिमिटेशनचा कायदा मंजूर करावाच लागेल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. आज या प्रक्रियेला संविधानविरोधी म्हटले जात आहे, मात्र विरोध करणाऱ्यांनी आधी संविधान वाचायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.
२०२३ च्या विधेयकाचा दाखला
२०२३ मध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला होता, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. त्या विधेयकात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती आणि डिलिमिटेशन करून हे आरक्षण द्यायचे, हे त्यात स्पष्टपणे लिहिले होते. त्यावेळी एकाही पक्षाने डिलिमिटेशनला विरोध केला नव्हता. सर्वांनी डिलिमिटेशनसह आरक्षण स्वीकारले होते, असे ते म्हणाले. त्यामुळे आता अचानक विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दक्षिणेतील राज्यांना फायदा
सर्व राज्यांना सरसकट ५० टक्के जागा वाढवून दिल्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांचा फायदा झाला असून त्यांचे नुकसान झालेले नाही, असे फडणवीस म्हणाले. दक्षिणेतील १२० खासदारांपैकी ७५ खासदारांनी या विधेयकाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. डीएमकेने पाठिंबा दिला असून शरद पवार यांच्या पक्षानेही पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी महिला आरक्षण लागू होणारच नाही, असे विरोधकांना वाटले होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले की महिला आरक्षण आणायचेच, असे ते म्हणाले. डिलिमिटेशनच्या आड लपून महिला आरक्षण थांबवता येणार नाही. ३३ टक्के महिला लोकसभेत आणि विधानसभेत प्रवेश करतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा