मराठी मनोरंजनविश्वात विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मीकांत बेर्डे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. सहजसुंदर अभिनय आणि अफलातून विनोदाच्या जोरावर त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवले. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, थरथराट आणि हमाल दे धमाल यांसारख्या चित्रपटांमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला. त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते विजय कदम यांनी एका मुलाखतीत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
१९७८ पासूनची मैत्री
विजय कदम यांनी सांगितले की, त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री १९७८ पासूनची होती. चिसौका या नाटकात त्यांनी एकत्र काम केले होते. संगीत सुकामेवा या नाटकात अनेक विनोदी कलाकार एकत्र आले होते. एका गणेशोत्सवात नऊ दिवसांत त्यांनी अकरा प्रयोग केले. त्या प्रयोगांचे ते दोघेच निर्माते होते आणि दोघेच त्यात काम करत होते. अभिनेता आणि निर्माता म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून बेर्डे त्यांना खूप जवळचे होते, असे कदम यांनी सांगितले. बेर्डे यांचे लग्न आधी झाले आणि काही वर्षांनी कदम यांचे लग्न झाले. एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर बेर्डे यांनी गाडीत बसून कदम यांना गुंतवणुकीबाबत विचारले होते. दुसऱ्या दिवशी बेर्डे यांनी पाठवलेली व्यक्ती कदम यांच्या घरी येऊन गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करून गेली, असेही त्यांनी सांगितले. मित्राविषयीचे असे प्रेम फार क्वचित पाहायला मिळते, असे कदम म्हणाले.
शेवटच्या तीन दिवसांचा प्रसंग
शेवटच्या तीन दिवसांबद्दल बोलताना विजय कदम भावुक झाले. त्यावेळी त्यांच्या घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर रुग्णालय होते. प्रिया इतर कामात व्यग्र असल्याने त्यांनी कदम यांना बेर्डे यांच्यासाठी दहीभाताचा डबा घेऊन जाण्यास सांगितले होते. त्या तीन दिवसांत अस्ताला जाणाऱ्या मित्राला पाहताना कदम आतल्या आत कुढत होते. मात्र, त्यांनी एक गोष्ट शेवटपर्यंत पाळली. बेर्डे यांना काही करू नकोस, असे ते कधीच बोलले नाहीत. कारण ज्यांनी ज्यांनी त्यांना तसे सांगितले, त्या प्रत्येकाशी बेर्डे यांनी अबोला धरला होता. फक्त कदम एकटेच असे होते, ज्यांनी त्यांना काहीही सांगितले नव्हते. आपण मित्राला कुठेही दुखावले नाही, याचे त्यांना आज समाधान वाटते, असे विजय कदम यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा