परदेशात चांगली नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनं आपल्या छंदातूनच कमाईचा वेगळा मार्ग शोधला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणारी ही महिला मेहंदी कलाकार म्हणूनही काम करते आणि मेहंदीतून तिला दिवसाला लाखभर रुपयांपर्यंत कमाई होते. तिचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
तासाला १०० डॉलरचे दर
प्रियंका जैन असे या महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेत पूर्णवेळ सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करते. तिच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत नोकरी असली, तरी मेहंदी काढण्याची आवड तिने व्यवसायाच्या स्वरूपात जपली आहे. मेहंदी काढण्यासाठी ती तासाला साधारण १०० डॉलर, म्हणजे भारतीय चलनात सुमारे नऊ ते दहा हजार रुपये आकारते. काही ग्राहकांकडून तिला याशिवाय २० टक्क्यांपर्यंत टिपही मिळते. लग्नासाठी वधूची मेहंदी काढायची असल्यास सलग दहा तास काम करावे लागते आणि त्यातून एका दिवसात जवळपास एक लाख रुपये मिळू शकतात, असे तिने सांगितले.
कलाकारांच्या कामाला सन्मान मिळतो
प्रियंकाच्या मते, अमेरिकेत कलाकारांच्या कामाला आणि कलेला आदर दिला जातो. भारतात मेहंदी कलाकाराच्या कामाकडे तितक्या प्रतिष्ठेने पाहिले जात नाही, असे तिला जाणवले. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते; प्रत्येक कामाला योग्य मान मिळायला हवा, अशी तिची भावना आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून त्याला जवळपास एक कोटी व्ह्यूज मिळाल्याचे वृत्त आहे. तिच्या कमाईसोबतच पारंपरिक कलेला परदेशात मिळणाऱ्या सन्मानाचीही चर्चा होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा