दिल्ली सरकारने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासाचे दरवाजे शुक्रवारपासून सामान्य नागरिकांसाठी उघडले आहेत. ६ फ्लॅगस्टाफ रोड येथील या बंगल्याबाहेर शीशमहल असे फलक लावण्यात आले आहे. बंगल्याच्या उभारणीवर एकूण ५८ कोटी ८३ लाख ६६ हजार ३१४ रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात आहे. बंगल्यातील पलंग, सोफा, टेबल अशा प्रत्येक वस्तूवर तिची किंमत दर्शवणारे टॅग लावण्यात आले आहेत.
बंगल्यातील वस्तूंच्या किंमती किती?
जेवणाच्या टेबल-खुर्च्यांची किंमत ३०.५२ लाख रुपये सांगितली जात आहे. पडद्यांची किंमत ५ लाख रुपये, तर झुंबराची किंमत ११ लाख रुपये आहे. देवघरासाठी ७ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. स्लायडिंग दारे असलेल्या बैठकीची किंमत ४१.१६ लाख रुपये, पावडर रूमची ५.८० लाख रुपये, तर लॉबीची किंमत ७.५८ लाख रुपये आहे. स्वयंपाकघरातील सामान वर-खाली नेण्यासाठी बसवलेल्या डंबवेटर लिफ्टची किंमत ७ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
बंगला पाहण्यासाठी तिकीट किती?
बंगला पाहण्यासाठी तिकिटाची किंमत सुमारे २० रुपये असू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची योजना आहे. दिल्ली सरकारची योजना हा बंगला काही काळ सामान्य जनतेसाठी खुला ठेवण्याची आहे. त्यानंतर तो एका खासगी हॉस्पिटॅलिटी कंपनीकडे सोपवण्याची तयारी आहे. ती कंपनी तिथे सरकारी परिषदा, भोजन आणि बैठका आयोजित करू शकेल.
केजरीवाल मुख्यमंत्री असताना २०१५ ते २०२४ या काळात कुटुंबासह या बंगल्यात राहत होते. दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री प्रवेश साहिब सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, जनतेच्या मागणीवरून शीशमहल लोकांना पाहण्यासाठी खुला केला जाईल. भ्रष्टाचाराचे हे मोठे उदाहरण लोकांसमोर आणायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा