मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक लोकशाहीसाठी घातक असून त्याद्वारे संपूर्ण सत्ता एका हातात केंद्रित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. या मुद्द्यावर रणनीती ठरवण्यासाठी आघाडीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत काय घडले?
डिलिमिटेशन बिलाबाबत भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अकरा पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते. आम आदमी पार्टी, डीएमके आणि बिजू जनता दल या आमंत्रित पक्षांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. तब्बल तासभर चाललेल्या या बैठकीत महत्त्वाची भूमिका घेण्यात आली.
खरगे म्हणाले की, काही लोकांना या बिलाचा धोका कळत नाही. ८५० जागा आल्या तर लोकशाही संपुष्टात येईल. सत्ता आपल्या हातात आणण्यासाठी डिलिमिटेशन बिल हत्यार म्हणून वापरले जाणार आहे. चीनमध्ये जे घडले तेच भारतात करण्याचा प्रयत्न सुरू असून हात उंचावून बहुमत निर्माण केले जात आहे. कायमस्वरूपी सत्ता हातात घेण्याचा आणि मनुस्मृती आणण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एससी-एसटी आणि निवडणूक आयोगावर प्रश्न
या विधेयकात अनुसूचित जाती आणि जमातींच्या हिताकडे लक्ष दिले गेले नाही, असे खरगे म्हणाले. हा त्यांच्यावर अन्याय आहे. संविधानानुसार राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागा वाढल्या पाहिजेत, पण विधेयकात त्याबाबत कोणतीही तरतूद नाही. २०२६ ची जनगणना येणार आहे. ताज्या जनगणनेनंतर एससी-एसटींची लोकसंख्या वाढल्याने त्यांना अधिक जागा मिळू शकतात, पण त्यांना त्यांचा वाटा द्यायचा नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे, असे खरगे म्हणाले. त्यांच्याच नेतृत्वात सर्व काही होणार असल्याने ते मनाप्रमाणे आणि सोयीप्रमाणे मतदारसंघांची पुनर्रचना करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आसाममध्ये त्यांनी जे केले ते समोर आहे. सर्वसाधारण जागा राखीव करता येईल आणि राखीव जागा सर्वसाधारण प्रवर्गात टाकता येईल, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा