नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार असतो. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफधारकांसाठी महत्त्वाचा प्रस्ताव आणला आहे. त्यानुसार निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पीएफमधील सर्व पैसे एकाच वेळी काढण्याऐवजी मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये पैसे काढता येणार आहेत. या हप्त्यांमध्ये पैसे काढताना कर लागणार नसल्याचे संघटनेचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी सांगितले आहे.
हप्त्यांमध्ये पैसे काढण्याची सुविधा
निवृत्तीनंतर पीएफची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही. तुम्ही सोयीनुसार मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्त्यांमध्ये पैसे काढू शकता. प्रस्तावित सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन अंतर्गत हप्त्यांमध्ये काढलेल्या रकमेवर कर लागणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पीएफ खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर इतर पीएफ सदस्यांप्रमाणे व्याज मिळत राहील. त्यामुळे निवृत्तीनंतरही बचतीत वाढ होईल.
किमान शिल्लक आणि प्रतीक्षा कालावधीत बदल
पीएफ खात्यात अनिवार्यपणे ठेवावी लागणारी किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठी असलेला प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून २ महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पीएफ खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या सुमारे ६.३२ लाख सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. पीएफ खातेदाराचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनीला जमा रक्कम मिळू शकेल. नॉमिनीला संपूर्ण रक्कम एकाच वेळी किंवा ठरावीक हप्त्यांमध्ये काढण्याचा पर्याय मिळू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या पीएफ खात्यात १० लाख रुपये जमा आहेत आणि वार्षिक व्याजदर ८.२५ टक्के आहे, तर वर्षाला ८२,५०० रुपये व्याज मिळेल. म्हणजेच सरासरी महिन्याला जवळपास ६,८७५ रुपये व्याज होईल. त्यामुळे गरजेनुसार कमी रक्कम काढून उरलेली रक्कम खात्यात ठेवता येणार आहे.
सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅनसाठी संघटनेने कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ईपीएफ नियम आणि प्राप्तिकर कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. यासंदर्भात कामगार मंत्रालयाची वित्त मंत्रालयासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर १ एप्रिलपासून ही योजना लागू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पण अंतिम अंमलबजावणीसाठी अधिकृत अधिसूचनेची वाट पाहावी लागेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा