३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. मात्र ही विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारला अजून सात खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. गेल्या सहा महिन्यांत पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय समीकरणे बदलण्याचे प्रयत्न झाले असून, आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सरकारने आपले शेवटचे पत्ते उघडले आहेत.
लोकसभेतील मतांचे गणित
लोकसभेत सध्या एकूण ५४० सदस्य आहेत, त्यापैकी तीन जागा रिक्त आहेत. सर्व सदस्यांनी मतदान केल्यास विधेयक मंजूर होण्यासाठी ३६० मतांची गरज लागेल. सध्या सत्ताधारी आघाडीकडे ३२० खासदार आहेत. एप्रिल महिन्यात हे संख्याबळ २९३ इतके होते. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी आणि ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत आलेल्या सहा खासदारांनी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ वाढले आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली होती, तर विरोधात २३० मते पडली होती. त्यावेळी सरकारला ५४ मतांची कमतरता होती आणि ती भरून काढण्यासाठी सरकारने राजकीय हालचाली केल्या.
उर्वरित सात मते कशी मिळणार?
सत्ताधारी आघाडीबाहेरील द्रमुकचे २२, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे ४ खासदार सोबत आल्यास बहुमताचा आकडा ३५४ पर्यंत जाईल. तरीही सरकारला सात मतांची गरज राहील. मात्र मतदानावेळी दहा खासदारांनी बहिष्कार घातल्यास आवश्यक मतांची संख्या घटून ३५३ पर्यंत येऊ शकते. विरोधी गटातील दहा खासदार मतदान प्रक्रियेवेळी गैरहजर राहिले, तरी सरकारचे मतांचे गणित जुळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हाच सत्ताधाऱ्यांचा हुकमी एक्का ठरू शकतो.
वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत एकूण २४४ सदस्य आहेत, त्यापैकी एक जागा रिक्त आहे. दोन तृतीयांश बहुमतासाठी तेथे १६३ मतांची गरज आहे. सत्ताधारी आघाडीकडे १५४ खासदार आहेत, त्यामुळे त्यांना नऊ मतांची गरज आहे. बिजू जनता दलाचे पाच आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे चार खासदार सोबत आल्यास १६३ मतांचा आकडा गाठता येईल. द्रमुकचे आठ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक खासदार सोबत आल्यास हे संख्याबळ १७२ पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील गणितावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा