बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करत पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षल शिंदे असे या तरुणाचे नाव असून, तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता.
नेमके काय घडले
याच दरम्यान एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे अन्न खाऊ घालत होती. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हर्षलवर बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्यानेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हर्षलची तीन वर्षांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून खूप जोरात पळाल्यामुळे हृदयावर ताण येऊन त्याला अटॅक आला, अशी माहिती समोर आली आहे.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेने बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर शहरात आज घडीला 15 हजार कुत्रे असल्याची माहिती समोर आली आहे. कुत्र्यांच्या हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पालिकेने डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ही समस्या एका दिवसात सुटणे शक्य नाही. पालिका प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून बदलापूरकरांची सुटका करू, असे आश्वासन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी दिले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा