भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण देश चालवण्यासाठी तेव्हा तयार राज्यघटना नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन वर्षे, पाच महिने आणि अकरा दिवस देश कोणत्या नियमांनुसार चालला, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या काळातच घटना समितीने भारतीय राज्यघटना घडवली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारण्यात आली. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
घटना घडवण्याचा प्रदीर्घ प्रवास
घटना समितीच्या बैठका 9 डिसेंबर 1946 पासून सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. मात्र हा अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रे पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला. अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती देशात अंमलात आली. तेव्हापासून भारत एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखला जातो.
ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची निवड निवडणुकीतून होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात. ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण तिथे घटनात्मक प्रमुख राणी असल्याने ते प्रजासत्ताक नाही.
स्वातंत्र्यानंतरची अडीच वर्षे कशी गेली
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, नियतीशी केलेल्या करारानुसारच स्वातंत्र्याची पहाट पाहायला मिळाली आहे. ब्रिटिशांनी जाता-जाता सर्वपक्षीय सरकारकडे सत्ता सुपूर्द केली होती. काँग्रेसचे नेहरू हे या सरकारचे नेते होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या विचारसरणीचे, पक्षांचे आणि सामाजिक पार्श्वभूमीचे नेते होते. त्यांच्या समन्वयाने देशाचा कारभार पहिली साधारण अडीच वर्षे चालला. नंतर 1951 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आणि विविध पक्षांमधले मतभेद स्पष्ट झाले. इंग्रज गेले तरी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून इथेच थांबले, तर जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले. आजही याच राज्यघटनेनुसार आपले सरकार, राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा