बदलापूर पश्चिमेतील शनिनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना १८ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
हर्षल शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मित्रासोबत मित्राला सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी एक महिला तिथे भटक्या कुत्र्यांना अन्न देत होती, असे सांगितले जाते. तिथून जात असलेल्या हर्षल आणि त्याच्या मित्राच्या मागे तेथीलच एक भटका कुत्रा लागला. हर्षलने जीव वाचवण्यासाठी पळ काढला आणि जवळच्या एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
परिसरात हळहळ; पालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्न
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात उपाययोजना केवळ कागदावरच आहेत का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. १८ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने बदलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीही अशीच दुर्दैवी घटना
बदलापुरात काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. रितिका करोचिया असे त्या मुलीचे नाव होते. घराच्या मागे मुलांसोबत खेळत असताना तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. रेबीजची दोन इंजेक्शन दिल्यानंतरही तिचा मृत्यू झाला होता, असे सांगितले जाते. या दोन घटनांमुळे बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा