वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैभव सूर्यवंशीने क्रिकेटच्या मैदानावर असा धुमाकूळ घातला आहे की, आता त्याच्या कमाईचीही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध त्याने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले. या खेळीत त्याने २८ षटकार आणि सात चौकार मारले. एकूण २०४ धावांची ही वादळी खेळी लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक म्हणून नोंदली गेली आहे. मैदानावरच्या या वादळामुळेच त्याची आर्थिक बाजूही आता चर्चेचा विषय बनली आहे.
आयपीएलमधून करोडोंची कमाई
वैभवने वयाच्या चौदाव्या वर्षी, २०२५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटी रुपयांना संघात घेतले होते. त्यानंतर पंधराव्या वर्षी, आयपीएल २०२६ मध्ये त्याच किमतीत त्याला संघात कायम ठेवण्यात आले. अशा प्रकारे दोन आयपीएल हंगामांमधून त्याने एकूण २.२ कोटी रुपये कमावले. पदार्पणाच्या हंगामापासूनच तो करोडपती क्रिकेटपटू बनला होता.
मानधनाव्यतिरिक्त त्याच्या स्फोटक खेळीमुळे त्याला सातत्याने बक्षिसेही मिळत राहिली. आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार मारल्याबद्दल त्याला १० लाख रुपये मिळाले. हंगामातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवताना त्याला आणखी १० लाख रुपये मिळाले. तर ऑरेंज कॅप जिंकल्याबद्दल १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याच हंगामात तो ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला, तसेच एकाच टी-२० स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदला गेला.
ब्रँड करार आणि इतर उत्पन्न
वैभव १९ वर्षांखालील क्रिकेटही खेळतो. या स्तरावर खेळण्यासाठी त्याला प्रत्येक सामन्यामागे २० हजार रुपये मिळतात. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारांमधून त्याला सातत्याने उत्पन्न मिळत आहे. त्याच्या एकूण संपत्तीचा नेमका आकडा मात्र अजून समोर आलेला नाही. विविध अहवालांनुसार त्याची एकूण मालमत्ता अंदाजे ४ ते ५ कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
क्रिकेटमधून मिळणाऱ्या कमाईबरोबरच ब्रँड करारांतूनही त्याला मोठे उत्पन्न मिळते. क्रिकेट उपकरणांच्या क्षेत्रात तो सारिन स्पोर्ट्स इंडस्ट्रीजशी जोडला गेला आहे. या कंपनीने त्याच्या नावाने बॅटची विशेष मालिका बाजारात आणली आहे. इतक्या लहान वयात त्याने मैदानावर मिळवलेले यश आणि त्यातून उभे राहिलेले आर्थिक बळ पाहता, येत्या काळात त्याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा