अमेरिकेने भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर नव्याने आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामुळे भारतावर 17 टक्क्यांपर्यंत शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. वेळेत व्यापार करार झाला नाही तर हे शुल्क 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. काही देशांमध्ये उत्पादन क्षमता गरजेपेक्षा जास्त असल्याने अमेरिकन उद्योगांचे नुकसान होत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार?
या संभाव्य शुल्काचा फटका पोलाद, वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि औषध निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे भारतासमोर निर्यात वाढवणे आणि अमेरिकेशी व्यापार करार करणे, असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेतही या प्रस्तावाला विरोध होत असल्याचे समोर आले आहे.
भारताची भूमिका काय?
भारताने अमेरिकेच्या या प्रस्तावाची दखल घेतली आहे. आपल्या कोणत्याही क्षेत्रात गरजेपेक्षा जास्त उत्पादन क्षमता नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. भारत सरकार अमेरिकेने जारी केलेल्या नोटिशीचा सखोल अभ्यास करत आहे. तसेच अमेरिकन प्रशासनासमोर आपली बाजू ठामपणे मांडण्यात आली आहे. अमेरिका-भारत व्यापार करार लवकरच पूर्ण करण्यास भारत कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा