पुण्यात एका आरोपीवर न्यायालयाच्या आवारात कोयत्याने सपासप वार झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर झाला असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी तर पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विटरवर लिखित स्वरूपात आपली भूमिका मांडून गुन्हेगारीवर आम्ही बोलायचे नाही का, असा सवाल केला आहे.
रोहित पवार यांनी याआधी म्हटले होते की, सुनेत्रा पवार या अजितदादांसारखे काम करत नाहीत. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असे मोठे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर मोठा राजकीय वाद उफाळला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी मी सुनेत्रा काकींची व्यक्तिगतरित्या माफी मागतो, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, रोहित पवार यांनी आता नवी भूमिका घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्रिपदावर नव्याने भाष्य केले आहे.
## रोहित पवार यांनी काय म्हटले?
प्रशासनावर मजबूत कमांड असलेल्या अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. स्वतःचे वेगळे अस्तित्व प्रत्येक व्यक्ती निर्माण करू शकतो, पण हा त्यांच्या कष्टाचा आणि जिद्दीचा विषय आहे. तसे अस्तित्व सुनेत्रा काकीही निर्माण करतील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पण दादा गेल्यानंतर पुणे आणि बारामतीत गुन्हेगारी ज्या वेगाने वाढली, त्यावर आम्ही बोलायचे नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यात भरदिवसा खून, गोळीबार आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असताना आम्ही तोंडाला कुलूप लावून बसायचे का, असेही त्यांनी विचारले आहे. या गुन्हेगारीचा फटका पोलीस संरक्षणात फिरणाऱ्या नेत्यांना कधीच बसत नाही, तर सामान्य माणसे याचे बळी ठरतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
कोणत्याही महिलांच्या क्षमतेबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही. देशाच्या सर्वात कणखर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सुनेत्रा काकींच्या क्षमतेवरही आमचा प्रश्न नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. एखाद्या पदावरील व्यक्तीवर जेव्हा टीका केली जाते, तेव्हा ती लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्या पदावर बसलेल्या पुरुषावर किंवा महिलेवर केलेली टीका नसते, तर त्या पदावर केलेली टीका असते, हे आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दादांच्या कामाची बरोबरीही कुणीच करू शकत नाही, हे सत्य नाही का, असाही रोखठोक प्रश्न त्यांनी केला आहे.
## भाजपवरही निशाणा
याचाच फायदा उठवत भाजपने सुनेत्रा काकींचे पंख छाटण्याचे राजकारण केले नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. आधी त्यांच्या पक्षाकडील अर्थखाते काढून घेतले आणि आता त्यावर ब्र शब्दही काढत नाहीत, त्यावर देखील हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत का, असा खोचक सवाल त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना केला आहे. आज त्या पुण्याच्या पालकमंत्री जरूर आहेत, पण त्यांना पूर्ण अधिकार दिलेत का? नसतील दिले तर त्यावर देखील ही मंडळी आंदोलन करणार आहे का, असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा