डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला डीएमके आणि शरद पवारांच्या खासदारांच्या मतांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध न दर्शवता विधेयक आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या विषयाभोवतीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
## अहिर यांचे पवार आणि शिंदे यांच्याबद्दल विधान
शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल महत्त्वाचे विधान केले असून, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर प्रदूषण विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम आणि संविधान वाचनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अहिर यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना अहिर म्हणाले की, सुनेत्रावहिनी यांच्याबद्दल निश्चितच आदर आहे, मात्र प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, कार्यपद्धती आणि योगदान वेगळे असते. त्यामुळे दादांची तुलना त्यांच्याशी करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
## पुणे घटनेवर कठोर कारवाईची अपेक्षा
पुण्यात दिवसा अशी घटना घडते, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे अहिर म्हणाले. पुणे नेमके कुठे चालले आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे ही सर्वप्रथम प्रशासनाची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले. प्रशासनाकडून योग्य आणि प्रभावी कारवाई होत नसेल, तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील माहीम परिसरात ज्वेलर्सवर गोळीबार झाला, तसेच सिने कलाकारांना धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपीचा काही तासांत शोध घेतला, ही पोलिसांसमोरील मोठी कसोटी असल्याचे अहिर म्हणाले. मात्र या प्रकरणातील आरोपींचे सिंडिकेट किंवा इतर संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी काही संबंध आहेत का, याचाही सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
## पवार-शिंदे एकत्र आल्यास आनंद होईल
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना अहिर म्हणाले की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र सत्तेत आले, तर सर्वांनाच आनंद होईल आणि एनडीएची ताकद राज्यात आणि देशात वाढेल. त्यांना सत्तेत यायचे की बाहेर राहायचे, हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादीने घेतलेली सकारात्मक भूमिका ही एका नव्या बदलाची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले.
दोन्ही नेत्यांमध्ये चांगला संवाद असल्याचे सांगत अहिर म्हणाले की, शरद पवार हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून ते आपल्या पक्षाची भूमिका आमदार आणि खासदारांना विचारून घेतील. राजकारणातून शरद पवार निवृत्त होणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा