शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअरने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. गुरुवारी या शेअरमध्ये ५.७० टक्क्यांची वाढ झाली असून शेअर ३,९९०.४० रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत बीएसईच्या शेअरमध्ये सुमारे ५२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे.
एचएसबीसीकडून बाय रेटिंग; ४,५०० रुपयांचे लक्ष्य
परदेशी ब्रोकरेज कंपनी एचएसबीसीने बीएसईच्या शेअरवर सकारात्मक भूमिका घेत बाय रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी ४,५०० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केले आहे. बुधवारच्या ३,७७५.२० रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत शेअरमध्ये आणखी सुमारे १९ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सहा वर्षांत ६,३९० टक्के परतावा
गेल्या सहा वर्षांत बीएसईच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ६,३९० टक्क्यांचा परतावा दिला आहे. २७ नोव्हेंबर २०२० रोजी या शेअरची किंमत अवघी ६१.४९ रुपये होती, तर २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ती ३,९९०.४० रुपयांवर पोहोचली. त्यामुळे त्यावेळी केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता सुमारे ६४.८९ लाख रुपये झाले असते.
बीएसईने आपल्या भागधारकांना आतापर्यंत दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. मार्च २०२२ मध्ये कंपनीने २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित केले होते. त्यानंतर मे २०२५ मध्येही याच प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या निर्णयाचा फायदा झाला. सध्या बीएसईचे बाजार भांडवल १,६२,७६२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
वरील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा