मराठी साहित्याच्या इतिहासात काही लेखक केवळ साहित्यनिर्मिती करत नाहीत, तर समाजाच्या विचारांची दिशाही बदलतात. डॉ. शरणकुमार लिंबाळे हे त्यांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या साहित्य आणि वैचारिक लेखनातून दलित साहित्याला नवी दिशा, स्वतंत्र सौंदर्यदृष्टी आणि व्यापक वैचारिक पाया मिळाला.
उपेक्षितांच्या वेदनांना शब्द देताना त्यांनी जातीय विषमतेविरुद्ध विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार प्रभावीपणे मांडला. त्यांचे साहित्य केवळ वेदनांचे चित्रण नाही; ते मानवी प्रतिष्ठेचा आग्रह धरणारे आणि समतेवर आधारित समाजनिर्मितीची आकांक्षा व्यक्त करणारे लेखन आहे.
‘अक्करमाशी’पासून ‘सनातन’पर्यंतचा प्रवास
लिंबाळे यांचे नाव घेताच सर्वप्रथम आठवते ते त्यांचे गाजलेले आत्मकथन ‘अक्करमाशी’. मराठी दलित आत्मकथनाच्या परंपरेत ही कृती मैलाचा दगड मानली जाते. स्वतःच्या जीवनातील संघर्ष, सामाजिक उपेक्षा, जातिव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता आणि अस्मितेचा शोध त्यांनी यात अत्यंत प्रामाणिकपणे मांडला आहे.
त्यांची साहित्यनिर्मिती आत्मकथनापुरती मर्यादित नाही. कथा, कादंबरी, कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध प्रकारांत त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘नरवानर’, ‘दलित ब्राह्मण’, ‘सनातन’ आणि ‘गर्व से कहो’ या कृतींतून त्यांनी भारतीय समाजातील जातीय वास्तव, सांस्कृतिक संघर्ष आणि परिवर्तनाची प्रक्रिया विविधांगी पद्धतीने मांडली.
त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला २०२० चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक ठरले. ‘सनातन’च्या इंग्रजी अनुवादाला २०२४ च्या जेसीबी साहित्य पुरस्काराच्या अंतिम निवड यादीत स्थान मिळाले होते.
दलित साहित्याचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र
लिंबाळे यांचे सर्वांत महत्त्वाचे वैचारिक योगदान म्हणजे ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा समीक्षाग्रंथ. दलित साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र निकष या ग्रंथात मांडण्यात आले आहेत. त्यांच्या मते दलित साहित्याचे सौंदर्य केवळ भाषिक किंवा शैलीगत वैशिष्ट्यांमध्ये नसून त्याच्या अनुभवसत्यात, सामाजिक बांधिलकीत आणि विद्रोही जाणिवेत आहे.
त्यांच्या विचारविश्वावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव जाणवतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये त्यांच्या साहित्याच्या वैचारिक पायात दिसून येतात. दलित साहित्याने भाषिक आणि सामाजिक मर्यादांमध्ये बंदिस्त न राहता व्यापक मानवी जीवनाशी संवाद साधावा, अशी त्यांची भूमिका आहे.
Leave a Reply