मध्य प्रदेशात दारू खरेदी करायची असेल तर आधी वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने दारू पिणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत दारूच्या दुकानांसमोरच मेडिकल कॅम्प लावण्यात आले आहेत. दारू घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. तपासणीचा अहवाल योग्य आला तरच त्या ग्राहकाला दारू विकत घेण्याची आणि पिण्याची परवानगी मिळते.
दुकानासमोर मेडिकल कॅम्प; डॉक्टर आणि पोलिसांची नेमणूक
या उपक्रमासाठी सरकारने थेट सरकारी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांना दारू पिणाऱ्यांच्या सेवेत ठेवले आहे. दारूच्या दुकानांसमोर लावलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर ग्राहकांची तपासणी करतात. त्यांचे यकृत आणि मूत्रपिंड दारू पचवण्यासाठी योग्य स्थितीत आहेत की नाही, हे तपासले जाते. अहवाल समाधानकारक असेल तरच ग्राहकाला दारू दिली जाते. एवढेच नव्हे, तर दारू पिणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवण्यासाठी डॉक्टरांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचीही ड्युटी लावण्यात आली आहे.
सागरमधील मृत्यूंनंतर सरकारची कठोर भूमिका
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात देशी दारू पिऊन तीसपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि ही नवी व्यवस्था उभी केली. देशी दारूमुळे कुणाचा बळी गेला तर सरकार संबंधित परिसरातील दुकाने सील करून दारू विक्रीवर बंदी घालते, हे महाराष्ट्रात दिसून आले आहे. मात्र मध्य प्रदेश सरकारने दारू पिणाऱ्यांची आधीच वैद्यकीय तपासणी करण्याचा वेगळा मार्ग निवडला आहे. दारू पिण्यापूर्वी तपासणीची ही पद्धत देशात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा