काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. राहुल गांधी यांच्यांविरोधातील कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय आणि ईडीला तक्रारीत केलेल्या आरोपांमधील सत्यता पडताळण्याचे आणि या तपासाची माहिती देण्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नव्याने विचार करण्यासाठी हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पुन्हा पाठवले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींनाही पक्षकार करण्याचे आदेश दिलेले आहेत. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
याचिका कोणी दाखल केली होती?
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आरोप या याचिकेद्वारे केला होता. सीबीआय आणि ईडीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली होती. या तक्रारीच्या संदर्भात आणि आरोपांबाबत काही कागदपत्रेही त्यांनी न्यायालयात सादर केली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने मे २०२६ रोजी याचिकेवर सुनावणी घेतली. सीबीआय आणि ईडीद्वारे आरोपांची सत्यता कायद्यानुसार पडताळून बघावी आणि या प्रकरणाच्या तपासातील माहिती न्यायालयाला देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीबीआय आणि ईडीला तक्रारीची सत्यता पडताळून बघण्याचे आणि तपासात झालेल्या प्रगतीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते, त्याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गांधींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. या प्रकारची प्रक्रिया कायद्याला धरून नाही, असे सांगतानाच, याचिका दाखल करण्याची पात्रता आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या प्रकरणात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश रद्द केले असून, राहुल गांधींना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.
पुढे काय होणार?
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशानंतर हे प्रकरण पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार आहे. यासंदर्भातील याचिकेवर नव्याने विचार केला जाईल. राहुल गांधींना पक्षकार केल्यानंतर त्यांनाही या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.
Leave a Reply