हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या पुणे मेट्रोच्या लाईन ३ ला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपासून या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या दोन गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवण्यात आले आहेत. गर्दीचं व्यवस्थापन आणि प्रवाशांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणती स्थानकं लोकप्रिय?
जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांना प्रवाशांची विशेष पसंती मिळत आहे. या स्थानकांवरील वाढती गर्दी पाहता पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. अतिरिक्त गेट्समुळे स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना होणारा विलंब कमी होईल, असा अंदाज आहे.
लाईन ३ ची स्थिती
सध्या या मार्गावर २० मेट्रो गाड्या धावत असून दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. सेवा सुरू झाल्यापासून गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. हा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असून यावर सध्या १७ स्थानके सुरू आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी सांगितलं की, सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिलं जात आहे आणि एनसीएमसी कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे.
Leave a Reply