पुण्यातील बोपदेव घाट परिसरात विद्यार्थ्यांना टेम्पोने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीव्र उतारावरून भरधाव वेगात येत असलेल्या आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने तो थेट बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
नियंत्रण सुटल्याने टेम्पो घोळक्यात शिरला
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी एका महाविद्यालयाचे आहेत. बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून येत असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या या टेम्पोने आधी एका वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसून पुढे आणखी काही वाहनांनाही जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका का झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी आणि पुढील तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा